Friday, February 4, 2011

swami ramdas -करुणाष्टके

.. करुणाष्टके ..

    .. जय जय रघुवीर समर्थ ..

      श्रीसमर्थ रामदास स्वामिकृत

             करुणाष्टके

अनुदिन अनुतापे तापलो रामराया .
परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ..
अचपळ मन माझे नावरे आवरीता .
तुजविण शिण होतो धाव रे धाव आता .. १..
( O Rama, I am extremely tormented by the daily struggle of life. O
most sympathizing one, cut away the temptation that has come to me with mAyA.
This very fickle mind of mine is difficult to control. There is a lot of
sorrow  without you ! Run to me immediately !
)
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला .
स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ..
रघुपति मति माझी आपुलीशी करावी .
सकळ त्यजुनि भावे कांस तूझी धरावी .. २..

विषयजनित सूखे सौख्य होणार नाही .
तुजविण रघुनाथा ओखटे सर्व काही ..
रविकुळटिळका रे हीत माझे करावे .
दुरित दुरि हरावे स्वस्वरूपी भरावे .. ३..

तनु- मन- धन माझे राघवा रूप तुझे .
तुजविण मज वाटे सर्व संसार वोझे ..
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी .
अचल भजनलीला लागली आस तूझी .. ४..

चपळपण मनाचे मोडिता मोडवेना .
सकळ स्वजनमाया तोडिता तोडवेना ..
घडि घडि बिघडे हा निश्चयो अंतरीचा .
म्हणवुनि करुणा हे बोलतो दीनवाचा .. ५..

जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी .
मजवरि करुणेचा राघवा पूर लोटी ..
तळमळ निववी रे राम कारुण्यसिंधू .
षड्रिपुकुळ माझे तोडि याचा समंधू .. ६..

तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी .
शिणत शिणत पोटी लागली आस तूझी ..
झडकरि झड घाली धाव पंचानना रे .
तुजविण मज नेती जंबुकी वासना रे .. ७..

सबळ जनक माझा राम लावण्यकोटी .
म्हणवुनि मज पोटी लागली आस मोठी ..
दिवसागणित बोटी ठेवूनि प्राण कंठी .
अवचट मज भेटी होत घालीन मीठी .. ८..

जननिजनकमाया लेकरू काय जाणे .
पय न लगत मूखी हाणिता वत्स नेणे ..
जळधरकणाअशा लागली चातकासी .
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी .. ९..

तुजविण मज तैसे जाहले देवराया .
विलग विषमकाळी तूटली सर्व माया ..
सकळजनसखा तू स्वामि आणीक नाही .
वमकवमन जैसे त्यागिले सर्व काही .. १०..

स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे .
रघुपतिविण आता चित्त कोठे न राहे ..
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती .
विषय सकळ नेती मागुता जन्म देती .. ११..

सकळ जन भवाचि आथिले वैभवाचे .
जिवलग मग कैचे चालते हेचि साचे ..
विलग विषमकाळी सांडिती सर्व माळी .
रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळी .. १२..

सुख सुख म्हणता हे दुःख टाकूनि आले .
भजन सकळ गेले चित्त दुश्चीत जाले ..
भ्रमित मन कळेना हीत ते आकळेना .
परम कठिण देही देहबुद्धि वळेना .. १३..

उपरति मज रामी जाहली पूर्णकामी .
सकळभ्रमविरामी राम विश्रामधामी ..
घडिघडि मन आता रामरूपी भरावे .
रघुकुळटिळका रे आपुलेसे करावे .. १४..

जलचर जळवासी नेणती त्या जळासी .
निशिदिन तुजपाशी चूकलो गूणरासी ..
भुमिधर निगमासी वर्णवेना जयासी .
सकळभुवनवासी भेट दे रामदासी .. १५..

असंख्यात ते भक्त होऊनि गेले .
तिन्ही साधनांचे बहू कष्ट केले ..
नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालो .
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो .. १६..

बहू दास ते तापसी तीर्थवासी .
गिरीकंदरी भेट नाही जनांसी ..
स्थिती ऐकता थोर विस्मीत जालो .
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो .. १७..

सदा प्रेमराशी तया भेटलासी .
तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्यराशी ..
अहंता मनीं शब्दज्ञाने बुडालो .
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो .. १८..

तुझ्या प्रीतिचे दास जन्मास आले .
असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले ..
बहू घोरणा थोर चक्कीत जालो .
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो .. १९..

बहूसाल देवालये हाटकाची .
रसाळा कळा लाघवे नाटकाची ..
पुजा देखिता जाड जीवी गळालो .
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो .. २०..

कितेकी देह त्यागिले तूजलागी .
पुढे जाहले संगतीचे विभागी ..
देहेदुःख होताचि वेगी पळालो .
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो .. २१..

किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती .
किती धर्मसंस्थापना अन्नशांती ..
पस्तावलो कावलो तप्त जालो .
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो .. २२..

सदा सर्वदा राम सोडूनि कामी .
समर्था तुझे दास आम्ही निकामी ..
बहु स्वार्थबुद्धीने रे कष्टवीलो .
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो .. २३..

नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान काही .
नसे प्रेम हे राम विश्राम नाही ..
असा दीन अज्ञान मी दास तूझा .
समर्था जनीं घेतला भार माझा .. २४..

उदासीन हे वृत्ति जीवी धरावी .
अती आदरे सर्व सेवा करावी ..
सदा प्रीति लागो तुझे गूण गाता .
रघूनायका मागणे हेचि आता .. २५..

सदा सर्वदा योग तूझा घडावा .
तुझे कारणी देह माझा पडावा ..
उपेक्षू नको गूणवंता अनंता .
रघूनायका मागणे हेचि आता .. २६..

नको द्रव्य- दारा नको येरझारा .
नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा ..
सगूणी मना लावी रे भक्तिपंथा .
रघूनायका मागणे हेचि आता .. २७..

मनीं कामना कल्पना ते नसावी .
कुबुद्धी कुडी वासना नीरसावी ..
नको संशयो तोडि संसारव्यथा .
रघूनायका मागणे हेचि आता .. २८..

समर्थापुढे काय मागो कळेना .
दुराशा मनीं बैसली हे ढळेना ..
तुटो संशयो नीरसी सर्व चिंता .
रघूनायका मागणे हेचि आता .. २९..

ब्रिदाकारणे दीन हाती धरावे .
म्हणे दास भक्तास रे उद्धरावे ..
सुटे ब्रीद आम्हांसी सांडून जाता .
रघूनायका मागणे हेचि आता .. ३०..

विश्रांति देही अणुमात्र नाही .
कळाभिमाने पडिलो प्रवाही ..
स्वहीत माझे होता दिसेना .
तुजवीण रामा मज कंठवेना .. ३१..

विषयी जनाने मज लाजवीले .
प्रपंचसंगे आयुष्य गेले ..
समयी बहु क्रोध शांती घडेना .
तुजवीण रामा मज कंठवेना .. ३२..

संसारसंगे बहु पीडलो रे .
कारुण्यसिंधू मज सोडवी रे ..
कृपाकटाक्षे सांभाळि दीना .
तुजवीण रामा मज कंठवेना .. ३३..

आम्हां अनाथांसि तू एक दाता .
संसारचिंता चुकवी समर्था ..
दासा मनीं आठव वीसरेना .
तुजवीण रामा मज कंठवेना .. ३४..


       .. समाप्त ..

No comments:

Post a Comment